ट्रिगर – १ लागु; वर्ध्यात पंचनाम्यांना वेग

३ ऑक्टोबरपर्यंत ९२४५३ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण; १६ हजार ८०० खातेदारांचा समावेश

 

वर्धा : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या वर्धा जिल्ह्यात शासनाच्या ‘ट्रिगर – १’ अंतर्गत पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील सातही तालुके ट्रिगर – १ अंतर्गत पात्र ठरले असून, ३ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध अहवालानुसार ९२ हजार ४५३.८२ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या प्रक्रियेत आत्तापर्यंत १६ हजार ८०० खातेदारांचा समावेश झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्यता आहे.

वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ३ लाख ७३ हजार ९१७.६१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली होती, या क्षेत्राशी संबंधित २ लाख २ हजार ८३८ खातेदार असून जिल्ह्यातील १ हजार २६८ गावांचा अहवालात समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, हिंगणघाट आणि समुद्रपूर या सर्व तालुक्यांमध्ये पंचनाम्याचे काम सुरू आहे. अहवालानुसार वर्धा तालुक्यात १५६ गावे, सेलू १७१, देवळी १५२, आर्वी २२१, आष्टी १५८, हिंगणघाट १८८ आणि समुद्रपूर तालुक्यात २२२ गावांचा समावेश आहे.

आर्वी तालुक्यातील पंचनाम्याची व्याप्ती मोठी असून १४ हजार ५३६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याची नोंद आहे. देवळी तालुक्यात ३ हजार १४२ हेक्टर, सेलू तालुक्यात २ हजार ८९.५६ हेक्टर, आष्टी हे १ हजार ३३३.४ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत, आणि समुद्रपूर तालुक्यातील पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पुढे जात आहे. दरम्यान, ट्रिगर – १ लागू झाल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषामानुसार मदत मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी व संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही केली जात आहे. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती शासनस्तरावर पाठवण्यात येणार असून, त्यानंतर मदत वितरणास प्रक्रिया पुढे सरकणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पंचनाम्यांच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे. उर्वरित क्षेत्रातील पंचनामेही तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्त प्रत्येक पात्र शेतकऱ्याला शासनाची मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *