प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : लोकप्रतिनिधीच सार्वजनिक मालमत्तेवर डल्ला मारत असल्याचे धक्कादायक वास्तव देवळीत समोर आले आहे. देवळी नगर परिषदेच्या एका नगरसेवकाने सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या बोअरवेलमधून पाणी चोरी करत वापर केल्याचा प्रकार पुढे आल्याचे सांगण्यात येते. तक्रारीनंतर झालेल्या पाहणीत हा प्रकार पुढे आल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथील प्रभाग क्र. ३ मधील काळा पूल परिसराजवळ नगर परिषदेचे सार्वजनिक सुलभ शौचालय आहे. या शौचालयाची स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र बोअरवेल आणि वीज जोडणीची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक सुलभ शौचालयाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
पाण्याअभावी शौचालयाची स्वच्छता होत नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून घाणीचा विळखा निर्माण झाला होता. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली. यावेळी ५० मीटरची पाइपलाइन आणि अवैध जोडणी स्पष्टपणे दिसून आली. सरकारी मालमत्तेची चोरी आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करून तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देवळीतील नागरिकांनी केली आहे. आता मुख्याधिकारी व नगर परिषद प्रशासन यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाबाबत चौकशीनंतर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी व्यक्त केली.
याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात येईल. समितीचा अहवाल आल्यानंतर प्रशासकीय नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी नेहा आकोडे यांनी सांगितले.