वर्धा (जिमाका) : अधिसूचित क्षेत्रातील सिंधी समाजाच्या विस्थापित नागरिकांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल व फ्री होल्ड करण्यासाठी शासनाने विशेष अभय योजना जाहिर केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सिंधी समाजाच्या जमिनी नियमानुकूल, फ्री होल्ड करण्याची कारवाई गतीने करा. समाजबांधवांकडून याबाबत १ हजार ३०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. ही सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंड नियमानुकूल, फ्री होल्ड करण्याबाबत पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, तहसिलदार संदीप पुंडेकर, सिंधी समाजातील कन्हैयालाल चैनानी, महेश भाटीया, रामचंद्र डोडानी, हरीश जोतवानी, राजकुमार कलवानी यांच्यासह महसूल, भूमी अभिलेख, नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
देशाच्या फाळणीवेळी भारतात आलेल्या सिंधी बांधवांना निवासी, वाणिज्यिक प्रयोजनार्थ भूखंडाचे वितरण करण्यात आले होते. तथापि अशा मालमत्तांच्या अधिकार अभिलेखात अनेक ठिकाणी भोगवटादार वर्ग दोन अथवा ब, ब-१, ब-२ अशा नोंदी आहेत. राज्य शासनाने असे भूखंड अधिकार अभिलेखात अ-१ सत्ताप्रकार किंवा भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद करण्याचे निर्देश दिले होते. परंतु जिल्ह्यातील काही सिंधी बांधवांकडे आवश्यक दस्तऐवज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे भूखंड नियमानुकूल करण्यात अडचणी येत होत्या.
अशा सिंधी बांधवांना दिलासा देण्यासाठी मागील वर्षी राज्य शासनाने विशेष अभय योजना राबविण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात या बांधवांना योजनेंतर्गत हक्काचे भूखंड देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले होते. त्यानुसार आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी समाज बांधव व प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. पालकमंत्री कार्यालयाकडे १ हजार ३०० हून अधिक सिंधी बांधवांचे भूखंड नियमानुकूल, फ्री होल्ड करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या सर्वच प्रस्तावांवर कारवाई करून प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
राज्य शासनाच्या योजनेनुसार भूखंड नियमानुकूल, फ्री होल्ड करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. सिंधी बांधवांनी या कागदपत्रांची उपलब्धता करून द्यावी. याकरीत गरज पडल्यास विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीत दिले. यावेळी उपस्थित सिंधी समाज बांधवांनी आपल्या समस्या, अडचणी मांडल्या तसेच भूखंड नियमानुकूल करण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे आभार मानले.