प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण करत व्यक्त केला रोष

वर्धा : शहरालगतच्या गोपुरी चौक ते साटोडा बायपासपर्यंतच्या रस्त्याचे दोन वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण करीत रोष व्यक्त केला.

गोपुरी चौक ते साटोडापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम दोन वर्षे लोटूनसुद्धा पूर्णत्वास गेलेले नाही. केवळ २०० मीटरच काम झाले आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा टाकला, पण गिट्टी उघडी पडून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गिट्टी उघडी असल्याने मणक्याचे आजाराला सामोरे जावे लागते. धुळीमुळे अनेक जण श्वसनाच्या आजाराने ग्रस्त आहेत. अपघाताच्या घटनांत मोठी वाढ झाली असून प्रशासनाची डोळेझाक होत आहे. महाकाळ, साटोडा, आलोडी, नालवाडी आदी गावातील नागरिक या मार्गाने ये-जा करतात.

विद्यार्थीदेखील जीव मुठीत घेऊन आवागमन करतात. या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांनी वारंवार निवेदनसुद्धा दिले, परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. रस्त्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी साटोडाचे सरपंच गौरव गावंडे, वर्धा कृषी बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, ग्रामपंचायत सदस्य नरेश होनाडे, संदीप मारवाडी, प्रवीण नागोसे, गणेश ढवळे, ज्ञानेश्वर जबादे, नितीन पचारे, बिपीन कठाणे, सुरज तेलरांधे, रमेश लाडेकर, जितेंद्र झाडे, बिरजू डोंगरे, विनोद सायरे यांच्यासह नालवाडी-आलोडी, साटोडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *