जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीसाठी भरीव तरतूद

वर्धा : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आंजी (मोठी) व तळेगांव (श्यापं) रुग्णालयांना निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित कामांसाठी आंजी रुग्णालयाला ३.१० कोटी, तळेगाव (श्या.पं.) रुग्णालयाला १५५.८४ कोटी तसेच आर्वी उपजिल्हा रुग्णालयाला ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्धेतील महिला रुग्णालयाच्या प्रशासकीय मान्यतेकरिता गती देण्यात आली आहे. या संदर्भात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सातत्याने मागण्यांचा पाठपुरावा केला होता. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मान्यता दिल्याने त्यांचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आभार मानले.

महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासनाने आंजी (मोठी) येथील ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. आंजी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी आ. राजेश बकाणे व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी पुढाकार घेतला होता. सदर रुग्णालयासाठी २६ कोटींची निधीची तरतूद केली आहे.

२०२५ च्या हिवाळी अधिवेशनात या कामासाठी ३.१० कोटींची तरतूद करण्यात आली. तळेगाव (श्या.पंत) येथे ३०० खाटांचे सामान्य रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकाम करणे या कामास १५५.८४ कोटी इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता प्रदान करून पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात आली आहे. आर्वी येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून या ठिकाणी १०० खाटांचे नवीन रुग्णालय इमारत बांधकामासाठी ३५.४५ कोटी इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता प्रदान करून पुरवणी मागणीद्वारे ५० लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दोन्ही रुग्णालयासाठी आ. सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता. आरोग्य विभागाने या दोन्ही प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली असून, त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. वर्धा जिल्ह्यातील आरोग्य सेवा क्षेत्राच्या विकासात यामुळे एक मोठा बदला होणार आहे. आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ. भोयर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *