खासदार अमर काळे यांची जिल्हा प्रशासनाला मागणी
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : सध्या सुरु होणाऱ्या खरीप हंगाम सुरु होणार असून हवामान तज्ज्ञांकडून पावसाळ्याबाबत वेगवेगळे हवामानाचे अंदाज वर्तविले जात आहे. या सर्व कृषी विषयक बाबींचे येणाऱ्या खरीप हंगामात परिपूर्ण नियोजन करण्याचे दृष्टीने जिल्हा स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी समवेत प्रशासनाची बैठक लावण्याबाबत खासदार अमर काळे यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.
पुढे सुरु होणाऱ्या खरीप हंगाम लक्षात घेता हवामान विभागाकडून पावसाळा संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. काही माध्यमांवर हवामान विभागाद्वारा पावसाळा लांबणार व पाऊस कमी पडणार असेही अंदाज वर्तवले जात आहे. नुकत्याच खरीप हंगामाच्या पूर्व तयारीकरिता शेतकऱ्यांची शेतीमशागतीची कामे सुरु झाली आहेत. परंतु प्रशासनाकडून कुठलेही नियोजन करण्यात आल्याचे अद्याप दिसून येत नाही. खरीप हंगामाकरीता आवश्यक कपाशीचे बीयाणे, तुर, ज्वारी व सोयाबीन अशा पद्धतीची खरीप हंगामासाठी किती बी-बियाणांची आवश्यकता आहे. तसेच खताच्या वाढत्या किंमती लक्षात घेता किती खताची आवश्यकता भासेल त्याचा पुरवठा कशा पद्धतीने करता येईल. इतकेच नाही तर उच्च प्रतीच्या बियाणांची कधी कधी तुटवडा जाणवून बाजारात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट निर्माण होणार नाही याही बाबतीत नियोजन करणे आवश्यक आहे.
नुकताच नाचनगांव येथे बोगस खताचे प्रकरण उजेडात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामासाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके हे उच्च प्रतिचे व प्रमाणितच उपलब्ध होईल याबाबतीत कृषी विभागाचे काय नियोजन आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच यंदा पावसाळा कमी झाल्यास पिक पद्धतीत बदल होणे अपेक्षित आहे. या बदलाचा देखील प्रशासन सामना करण्यास सज्ज असणे आवश्यक आहे. तसेच पावसाळा लांबणार असल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत व असलेला साठा काटकसरीने वापरण्याबाबत सुद्धा नियोजन असणे आवश्यक आहे. याबाबतच जिल्हा स्तरावर तातडीने बैठक लावून बैठकीत या सर्व बाबीवर चर्चा होऊन नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे येणाऱ्या कुठल्याही संकटाला लोकांकडून समर्थपणे सामना करण्याची तयारी असणे आवश्यक आहे व हीच तयारी प्रशासनाची सुद्धा असावी या दृष्टीने खासदार अमर काळे यांनी जिल्हा प्रशासनाला या विषयावर तातडीने बैठक लावण्याबाबत पत्र दिले आहे.