आंजी (मोठी) : आंजी येथे साईबाबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सात दिवस चाललेल्या या यात्रेचा समारोप झाल्यानंतरही बाजारपेठेत दुकानदार व ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र, या यात्रेनंतरच हिंसक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास, आरोपी चंद्रशेखर वामन पचारे (वय ३३, रा. आंजी मोठी) हा पुरुषोत्तम नानाजी वंजारी यांच्या कापड दुकानात आला. तेथे त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. उपस्थितांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शिवीगाळ सुरू ठेवली.
याच दरम्यान आरोपीने कमरेत लपवून ठेवलेला सत्तूर काढून चेतन पुरुषोत्तम वंजारी यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यावेळी त्यांना वाचविण्यास गेलेल्या त्यांचे वडील पुरुषोत्तम वंजारी यांनाही सत्तूरचा मार लागला. गंभीर जखमी अवस्थेतील चेतन वंजारी यांना तातडीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या वडिलांवर आंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सुट्टी देण्यात आली.