शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

हिंगणघाट/वर्धा : यावर्षीच्या खरीप हंगामात सततधार पाऊस, ढगफुटी सदृश स्थिती आणि रोगराईमुळे हिंगणघाट तसेच समुद्रपूर, सिंदी(रेल्वे) विधानसभा क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाच्या वतीने यासंबंधीची तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे नागपूर येथे भेट घेऊन केली आहे. काल दि. ११ रोजी राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या निमित्ताने ना.अजित पवार यांनी नागपूर येथे भेट दिली, यावेळी प्रा.तिमांडे यांनी निवेदन देत हिंगणघाट- समुद्रपूर-सिंदी(रेल्वे) विधानसभा क्षेत्र सह संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल पवारांशी चर्चा केली व संपूर्ण आढावा चर्च करण्यात दिला असता संपूर्ण नुकसानीच्या पंचनाम्याचा लवकरच लवकर अहवाल मागीतला असून शेतकऱ्यांना राज्यसरकार तर्फे मदत दिली जाईल असे आश्वासन त्यावेळेत उपमुख्यमंत्र्यांनी पवार यांनी दिले.

यावर्षी सततधार पावसामुळे या परिसरातील नद्यांना पूर आला, शेतजमिनी खदडून गेल्या, तर काही भागात दोन- दोन दिवस शेतात पाणी साचल्याने उभी पिके अक्षरशः नष्ट झाली आहेत. याशिवाय सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात येळो मोजक व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पानं पिवळी पडली, शेंगा सुकल्या आणि त्यात दाणेच न राहिल्याने उत्पादनाचा पूर्णतः घात झाला आहे. बळीराजाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एकरी एक किली सोयाबीन मिळणेही कठीण झाले आहे. काही भागातील शेतकरी निराश होऊन शेतात जनावरे सोडण्यास भाग पडले आहेत. दुसरीकडे, कापसाचे पीक सततच्या पावसामुळे पाण्यातळीत सडणप्याचा मार्गावर आहे.

हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर, पिपरी, फुंकटा ,बेनी जांगोना हिवरा, पोहणा, आजनसरा, शेकापूर, चिंचोली, पिंपळगाव, काजळसरा, नरसळा, उमरी, सावळी, बुरकसोनी, लांडकी आदी गावांसह समुद्रपूर तालुक्यातील खांडाळा, नारायणपूर, हळदगाव, कांदळी, मांडगाव, तळोडी, राळेगाव, बानरचुवा, रासा, गिरगाव, सावरा, चिखली, कवठा, निंभा, आरंभा नंदारी, लोणार, वासी, सावंगी, पिपरी, धानोरा आदीगावांत शेकडो हेक्टरातील सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगणघाट समुद्रपूर, सिंदी(रेल्वे) विधानसभा क्षेत्रात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असलेले सोयाबीन कापूस व तूर अक्षरशः नष्ट झाल्याने त्यांचे अर्थकारण पूर्णपणे डळमळीत झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कुटुंबाच्या रोजरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांचे कर्जफेडीचे ओझे अधिक वाढले असून ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *