प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रासह वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या प्रश्नावर आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. नीलगाय, हरिण, रोही व रानडुक्कर यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी व शास्त्रीय उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
या वेळी आमदार बकाने यांनी मध्यप्रदेश शासनाने यशस्वीपणे राबविलेल्या **‘बोमा तंत्रा’**चा संदर्भ देत, ही आधुनिक व सुरक्षित पद्धत महाराष्ट्रातही अमलात आणण्याची आवश्यकता मांडली. या तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्राण्याला इजा न करता, थेट फायबर नेटद्वारे त्यांना पकडून राखीव जंगलात सुरक्षित स्थलांतर केले जाते.
मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात अवघ्या ११ दिवसांत ९१३ नीलगाय व हरिणांचे स्थलांतर झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात थांबले असून मानव-वन्यजीव संघर्षात घट झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वर्धा जिल्ह्यात, विशेषतः देवळी-पुलगाव मतदारसंघात हा प्रयोग राबविल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार बकाने यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन्यप्राणी-मानव संघर्ष हा गंभीर विषय असल्याचे नमूद करत, संबंधित विभागांकडून प्रस्तावाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. या भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासाची आशा निर्माण झाली आहे.