गोठ्याला आग, कर्जाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा : तालुक्यातील नेरी येथील शेतकरी बंडूजी राऊत यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी राऊत यांच्या गोठ्याला आग लागून गाय-बैल भाजल्याची घटना घडली होती. या घटनेत मोठे नुकसान झाले नसले तरी त्यांच्यावर असलेले बँकेचे कर्ज आणि झालेल्या नुकसानीच्या चिंतेने ते मानसिकदृष्ट्या व्यथित होते. त्यातूनच त्यांनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

या घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी बंडूजी राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. पत्नी, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार मागे सोडून गेलेल्या राऊत यांच्या कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे खासदार काळे यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार पात्र असलेली सर्व मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, तसेच संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात संवेदनशिलतेने कार्यवाही करावी, खासदार अमर काळेंची राऊत कुटुंबीयांना भेट शासकीय मदत तातडीने देण्याचे प्रशासनाला निर्देश असे निर्देश खासदार अमर काळे यांनी प्रशासनाला दिले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक अथवा आकस्मिक संकटांमुळे कुटुंबावर येणारे संकट गंभीरपणे घेण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. राऊत कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार अमर काळे यांनी यावेळी दिली. यावेळी अजय डोंगरे, दिनेश राऊत, सुनील तळवेकर, बाबाराव निवल, राहुल सुरकार, प्रतिभा गावंडे, यशवंत झाडे, नागो सातकर, पुरुषोत्तम उगडे, जानूराम भोयर, श्यामा ठाकरे, नाना तोडाशे, सुनील सातपुते, महेश महल्ले, संकेत गावंडे, प्रफुल्ल देशमुख, अनिकेत राऊत यांच्यासह मिरापूर येथील मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *