१२. ३८ कोटींचे संत्रा मदतीसह पांदण रस्त्यांसाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर

आर्वी – नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आर्वी मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे यांनी कृतीशील नेतृत्वाची छाप सोडली आहे. त्यांनी सलग चार दिवस अत्यंत महत्त्वाचे जनहिताचे प्रश्न मार्गी लावून एकप्रकारे ‘विजयी चौकार’ लगावला आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये त्यांनी अनुक्रमे तळेगाव रुग्णालयासाठी रु. ५५.८३ कोटींचा विक्रमी निधी मंजूर करून आणला. दुसऱ्या दिवशी कारंजा येथील रु. १९२ कोटींच्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज प्रकरणावर आवाज उठवून जनसुरक्षेचा मुद्दा बुलंद केला. तिसऱ्या दिवशी ८,१९९ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु. १२.३८ कोटींच्या नुकसानभरपाई निधीला मंजुरी मिळवून ‘हॅट्रिक’ पूर्ण केली. अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत ‘संजीवनी’ ठरणार असून, त्यांनी आमदार वानखेडे यांचे आभार मानले आहेत.

आमदार वानखेडे यांचा धडाका चौथ्या दिवशीही कायम राहिला. त्यांनी मागील अधिवेशनात उपस्थित केलेल्या पांदण रस्त्यांच्या प्रश्नावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यानुसार, पांदण रस्त्यांच्या कामांसाठी आता स्वतंत्र ‘नवीन लेखाशीर्ष’ तयार केले जाईल आणि या योजनेचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतील. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. आमदार सुमित वानखेडे यांनी ‘जनआरोग्य’, ‘जनसुरक्षा’, ‘शेतकरी हित’ आणि ‘ग्रामीण विकास’ या चार प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करून अधिवेशनात आर्वीचा आवाज बुलंद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *