आकांक्षित कारंजा तालुक्याचा केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांकडून आढावा

वर्धा (जिमाका): जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यात विविध प्रकारच्या ३९ निर्देशांकावर कामे केली जात आहे. तालुक्यासाठी निती आयोगाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले केंद्रीय प्रभारी अधिकारी तथा भारत सरकारचे निवृत्तीवेतन संचालक रविकिरण उबाळे यांनी निर्देशांकांनुसार होत असलेल्या कामांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी श्रीमती बामन्थी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, कारंजाचे गट विकास अधिकारी प्रविण देशमुख तसेच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख आणि कारंजा तालुक्यातील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली कारंजा तालुक्यामध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तालुक्यात विविध विभागाकडील ३९ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर विषय व कार्यक्रमाच्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी नीती आयोगाकडून देशातील ५०० तालुक्यात केंद्र शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची केंद्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *