नगरविकासाच्या राज्य कार्यालयासाठी म्हाडाच्या माध्यमातून इमारत उपलब्ध करून देणार : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा येथे नगरविकासाची राज्यातील पहिली स्वतंत्र इमारत
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते इमारतीचे लोकार्पण
वर्धा (जिमाका) : वर्धा येथे नगरविकास विभागाची राज्यातील पहिली स्वतंत्र इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे. या इमारतीतून जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सुविधा मिळणे अपेक्षित आहे. वर्धा सारख्या शहरात स्वतंत्र इमारत होत असताना नगरविकासाच्या राज्य कार्यालयाला स्वतःची इमारत नाही. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून राज्य कार्यालयासाठी इमारत उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री तथा गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

नगररचना व मु्ल्यनिर्धारण विभागाची राज्यातील स्वतःची पहिली इमारत वर्धा येथे उभी झाली आहे. या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी, नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, नगरविकास विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, सहसंचालक विजय शेंडे, सुप्रिया थुल, सहाय्यक संचालक हर्षल गेडम, माजी संचालक वसंत किन्हीकर, क्रीडाईडीचे अध्यक्ष महेश गुल्हने, बांधकामचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले आदी उपस्थित होते.

नगरविकासाच्या राज्यातील कोणत्याही कार्यालयाला स्वतःची स्वतंत्र इमारत नाही. वर्धा येथे इमारतीसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आणि जिल्हा नियोजन समितीतून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सुसज्ज अशा इमारतीचे लोकार्पण होत असताना इमारतीचा हा पॅटर्न राज्यभर राबविण्यात यावा आणि त्यास वर्धा पॅटर्न असे संबोधण्यात यावे, असे पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले.

सर्वसामान्य नागरिक घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्लॉट घेत असतो. प्रसंगी त्यासाठी कर्ज सुद्धा घेतले जाते. परंतु नंतर प्लॉट घेतलेले एखादे ले-आऊट अधिकृत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर फार मोठे आर्थिक दडपण येते. वर्धेत देखील असे प्रकार झाले आहे. अशा पद्धतीने नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नगररचना विभागाने काळजी घेतली पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. नगररचना संचालक जितेंद्र भोपळे यांच्या ‘५५ पावसाळे’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांनी यावेळी केले व पुस्तकास शुभेच्छा दिल्या. संचालक श्री. भोपळे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी फित कापून व नामफलकाचे अनावरण करून इमारतीचे लोकार्पण केले तसेच इमारतीची पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीमधून इमारत बांधकामासाठी ३ कोटी ४९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात इमारतीवर २ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला. कार्यालय इमारतीचा परिसर १ हजार ८०० चौरस मीटर असून बांधकाम ४८८ चौरस मीटरवर करण्यात आले आहे. प्रास्ताविक नगररचनाचे सहाय्यक संचालक हर्षल गेडम यांनी केले तर आभार नगररचना अधिकारी भाग्यश्री बोरकर यांनी मानले. यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *