प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा :वर्धा जिल्ह्यातील घाटाचे लिलाव झाले असले तरी अजूनही कारवाई पूर्ण झाली नाही. परंतु मांडगाव-शेडगाव घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असून रोज सकाळी ५ ते ११.३० च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात टिप्परने अवैध वाळूची वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे सेवाग्राम पोलीस स्टेशनसमोरून ही अवैध वाळू वाहतूक होत असून पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करीत आहे.
वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत २५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलिसांनी केली.
सावंगी (मेघे) येथील पोलीस गस्त करत होते. त्यावेळी एका टिप्परमध्ये अवैध वाळू भरून वायगाव (चौरस्ता) येथून वर्धेच्या दिशेने वाळूची अवैध रित्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. नाकाबंदी दरम्यान हिंगणघाट ते वायगाव चौरस्ता कडून वर्धेच्या दिशेने भरधाव वेगाने टिप्पर येताना दिसला. टिप्पर थांबवून पाहणी केली असता टिप्परचा चालक प्रवीण ज्ञानेश्वरराव चवरे (वय ३८) रा. नाचणगाव, ता. देवळी याच्या ताब्यांतून एम.एच ३२ ए. जे. ५८३० क्रमांकाचा टिप्पर, वाळूसह असा २५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण ज्ञानेश्वरराव चवरे (वय ३८) रा. नाचणगाव आणि एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून यांनी केली.