तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वर्धा (जिमाका) :तंबाखू शाळा अभियानांतर्गत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनात तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख उपस्थित होते.

संपूर्ण शाळा तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात आयोजित तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजांभिये, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, सलाम फाउंडेशनच्या दिप्तीशा शिंदे, क्रिस्टीना यांनी मार्गदर्शन केले.

तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० अंतर्गत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू व पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कसे होतात, मुलांना व्यसनाची सवय कशी लागते आणि त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याकरिता शिक्षक हेच एकमेव गुरु असल्याने विद्यार्थ्यांना व्यसनापासून थांबविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात. त्यासाठी आपली शाळा तंबाखू मुक्त व आरोग्यदायी कशी बनविता येईल याविषयी प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तंबाखू मुक्त शाळेचे निकष समजावून सांगण्यात आले. यावेळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहण्याकरिता १८००११२३४६ या टोल फ्री क्रमांकाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री. वाघ यांनी केले. प्रशिक्षणास जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी पाच मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सायकॉलॉजिस्ट राहूल बुचूंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *