वर्धा : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक ९७+३०० येथे शुक्रवारी (२ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने बोलेरो पिकअपला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप क्रमांक MH 27 BH 5793 मधून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोखंडी रथाला जोडून सुमारे २० ते २५ जण प्रवास करत होते. हे वाहन कारंजा लाडहून वर्ध्याच्या दिशेने जात असताना चॅनल क्रमांक ९७+३०० येथे मागून आलेल्या CG 07 CJ 8855 क्रमांकाच्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली.
या धडकेत दत्ता खुरसंगे (५३), प्रवीण वकाने (५०), घनश्याम पाटील (६०), गोलू उर्फ सचिन बदलमवार (३८) आणि ओम गावंडे (२२) व दोन नावे कळू शकली नाहीत. मृतक हे वर्धा येथील सोमनाथे लेआउट, रामनगर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अपघातात सागर ढोले, राहुल मेहेकर, रोशन राऊत, नयन गोदाके, पवन ढोले, मुणेश्वर ढोले, अमित ठाकरे, सतीश कुडे, नंदू शिरसकर, दिनेश पवनकर, यश मलकापूर, सतीश राऊत आणि नरेंद्र सोयाम हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच प्रणय बोले, प्रतीक शिरसकर, अनुज अनिल आडे, दुर्गेश भिसे, आर्यन प्रभाकर वैद्य आणि शुभम ढोबाले यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती २ ऑक्टोबर रोजी रात्री १२.५७ वाजता समृद्धी महामार्ग कंट्रोल रूमकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील ॲम्बुलन्स, आरटीओ वाहन, पोलीस वाहन तसेच QRT टीमच्या मदतीने गंभीर जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी हलवले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात हलवण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे २०० मीटर अंतरावर कोण व बॅरिकेडिंग करण्यात आले होते. वाहतूक मंद गतीने सुरू ठेवण्यात आली. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने सर्व्हिस लेनवर हलविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकचालक वाहन काही अंतरावर उभे करून घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. ट्रकचालकाचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
