‘पुलगाव-विटाळा’ पूल मंजुरीवरून श्रेयवाद

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : पुलगाव येथे वर्धा नदीवर पुलगाव – विटाळा पुलाकरिता ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र त्यावरून श्रेयवादाची तिरंगी पडल्याचे दिसून येते. केंद्राकडून निधी मंजुरीनंतर खासदार अमर काळेंकडून पाठपुरावा केल्याबाबत माहिती देण्यात आली. तर आमदार राजेश बकाणे यांनी सत्य गदकरी यांच्या शब्दात आहे, असे सांगत पुलगाव-विटाळा पूल या जनहिताच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर काही जणांकडून सोशल मीडियावर खोट्या पोस्टद्वारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली आहे.

वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवर पूल आहे. पुलगाव – विटाळा पुलाची मागणी वेळोवेळी करण्यात आली. त्याकरिता केंद्र शासनाकडून ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

केंद्र सरकारकडून विविध विकासकामांकरिता निधी मंजूर झाला असून त्यामध्ये पुलगाव – विटाळा पुलाच्या कामाचा समावेश आहे. निधी मंजूर झाल्यानंतर खासदार अमर काळे यांच्यातर्फे पुलाच्या निधी मंजुरीकरिता सातत्याने प्रयत्न केल्याचे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाणे यांनी, सत्य कधीच लपत नाही. पुलाचे श्रेय जनतेच्या जनआदेशाला, गडकरी यांच्या दिलेल्या शब्दाला आणि आमच्या सातत्य पाठपुराव्याला आहे, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘राजेशाला आमदार करा; हा पूल मी करून देतो’, असे सांगितले होते.

जनतेने राजेश बकाणे यांना निवडून दिले आणि गडकरी यांनी दिलेले शब्द पाळत पूल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. आमदार राजेश बकाणे, आमदार प्रताप अडसड, माजी खासदार रामदास तडस यांनी मंत्रालयात, विभागीय कार्यालये आदी ठिकाणी येथे सतत भेटी देत तांत्रिक फाईल मजबूत केली. अडथळे दूर केले आणि प्रकल्प पुढे नेला,असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *