प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्हा आणि इंजि. तुषार उमाळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या अविरत साखळी रक्तदान उपक्रमाने आज ५५० व्या रक्तदात्याची नोंद पूर्ण करत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेला हा उपक्रम रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी ठरत आहे.
संविधान दिनानिमित्त कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेचे सचिव विजेंद्र नाईक यांनी रक्तदान करून ५५० वे रक्तदाता होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या रक्तदानी योगदानामुळे उपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीला बळ मिळाले आहे. उपक्रम सुरु झाल्यापासून आतापर्यंत शेकडो रुग्णांना तातडीच्या रक्ताची गरज भासल्यास वेळेवर मदत उपलब्ध होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना रक्तासाठी होणाऱ्या खर्चाचा ताण कमी होण्यासाठी या उपक्रमाचा मोठा उपयोग होत आहे. तातडीची मागणी मिळाल्यानंतर स्वयंसेवकांकडून रक्तदाते त्वरित उपलब्ध करून देण्यात येतात.
रक्तदानाबाबत जनजागृती वाढावी आणि अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, तसेच कर्मचारी संघटकांकडूनही सक्रीय सहभाग मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. युवकांमध्ये रक्तदान संस्कृती रुजविण्यासाठी स्वयंसेवकांकडून
सतत प्रचार व जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात एकही रुग्ण रक्ताच्या अभावी वंचित राहू नये, यासाठी उपक्रम अधिक मजबूत करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे संभाजी ब्रिगेड व इंजि. तुषार उमाळे मित्र परिवार यांनी सांगितले. आगामी काळात प्रत्येक तालुक्यात रक्तदात्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. रक्तदान ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले की, ‘रक्तदान करा आणि एखादा गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यात हातभार लावा.’