( अभय बेदमोहता ) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:सेलू: सामान्य कर्जदारांच्या दुःखावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार येथील बंधन बँकेच्या शाखेत उघडकीस येत असून, मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे की काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कर्जासोबत उतरवलेल्या विम्याचा लाभ देण्यास तब्बल ९ महिन्यांपासून टाळाटाळ करण्यात येत असल्याने मृतक महिलेच्या नातलगांना बँकेच्या उंबरठ्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.
सेलू येथील मेघा बडे यांचे बंधन बँकेच्या शाखेत खाते होते. त्यांनी १५ जानेवारी रोजी ६५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यावेळी बँकेने नियमानुसार कर्जदाराचा विमा उतरवून घेतला. विमा हप्त्यापोटी १,४५० रुपये तसेच प्रोसेसिंग फी कर्जाच्या रकमेतूनच कापण्यात आली, तर उर्वरित रक्कम त्यांच्या हाती देण्यात आली. विशेष म्हणजे, मेघा बडे या कर्जाचे नियमित हप्ते देखील भरत होत्या.
परंतु दुर्दैवाने एप्रिल महिन्यात त्यांचे आकस्मिक निधन झाले. कर्ज देताना बँकेनेच विमा उतरवून घेतल्याने मृत्यू पश्चात विम्याचा लाभ मिळणे हे पूर्णतः क्रमप्राप्त होते. नियमानुसार ९० दिवसांच्या आत विम्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.
मृत्यूनंतरच्या काळात बँकेने सहकार्य करण्याऐवजी मृतकाच्या नातलगांना गेल्या ९ महिन्यांपासून येरझारा मारण्यास भाग पाडले आहे. कधी कागदपत्रांची सबब, तर कधी प्रकरण प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून केवळ चालढकल कार्यक्रम सुरू आहे. सदर बँकेत कोणाचा जोडा कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था असून कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नातलगांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बँकेचे कर्मचारी विम्याचा लाभ देण्यास टाळाटाळ का करीत आहेत? याचा कानोसा घेतला असता हा लाभ आधीच हडपला गेला असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बंधन बँकेचा हा प्रकार म्हणजे मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा तर नाही ना, अशी तीव्र शंका आता व्यक्त केली जात आहे.
या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृतकाच्या कुटुंबियांना तातडीने विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे. अन्यथा बंधन बँकेविरोधात सर्व बंधने तोडत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील नातलगाकडून देण्यात आला आहे.