निमोनियावर मात करण्यासाठी जिल्ह्यात कृती अभियान

बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य

प्रतिनिधी / है. प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यातील ५ वर्षांखालील बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि यामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दि. १२ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सामाजिक जागरूकता आणि न्यूमोनिया निष्पक्ष करण्यासाठी कृती (हेल्थ) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात नागरिक व बालकांच्या पालकांनी सक्रीय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सामरा यांनी केले आहे.

देशातील एकूण बालमृत्यूंपैकी सर्वांत जास्त १८.३ टक्के मृत्यू हे न्यूमोनियामुळे होतात. या गंभीर आजाराचा प्रतिबंध लवकर, लवकर निदान आणि उपचार यावर अभियानात भर दिला जात आहे. सन २०२५ पर्यंत बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यूंचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमागे ३ पेक्षा कमी करणे, न्यूमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचाराबाबत स्तरावर जनजागृती, ५ वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे त्वरीत ओळखणे आणि उपचार करणे, तीव्र न्यूमोनियाच्या रुग्णांसाठी उपचाराकरिता आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

अभियान कालावधीत आरोग्यमार्फत ५ वर्षांखालील बालकांच्या घरोघरी भेटी देऊन न्यूमोनियाचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. न्यूमोनिया आणि न्यूमोनियाकोकल आजारांना प्रतिबंध करण्यासाठी न्यूमोनियाकोकल कॉन्जुगेट लस अत्यंत प्रभावी आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत ६ व्या आठवड्यात, १४ व्या आठवड्यात आणि ९ व्या महिन्यात बुस्टर डोस ही लस दिली जाते. सर्व बालकांनी ही लस घेणे अनिवार्य आहे.

न्यूमोनिया हा उपचार करण्यायोग्य आजार आहे, वेळेत लक्षणे ओळखून त्वरीत उपचार केल्यास बालमृत्यू टाळता येतात. पालकांनी आपल्या बालकांना वेळेवर लस द्यावी आणि आरोग्य सेविकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बर्डे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमित वाघ यांनी केले आहे.

अधिक माहिती आणि मदतीसाठी आशा ताईंशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी त्वरीत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *