खासदार अमर शरदराव काळे यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांना दिले पत्रवर्धा : अमरावती येथे दि. १६.५.२०२६ रोजी आयोजित केलेल्या खरीप आढावा सभेत खासदार अमर काळे यांनी अमरावती जिल्ह्याचे पालक मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटून नाफेड मार्फत होत असलेली चना खरेदीची मर्यादा संपल्याने ती तात्काळ वाढवून त्यासोबतच पुरेशी मुदतवाढ सुद्धा देण्याबाबत पत्र दिले व चर्चा केली. झालेल्या चर्चेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर बाब मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पणन मंत्र्यांच्या कानावर घालून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदार अमर काळे यांना दिले. खासदार अमर काळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचेसोबतच महाराष्ट्राचे पणन मंत्री साहेबराव पाटील यांना सुद्धा पत्र देऊन त्यांचेकेडे चना खरेदीची मर्यादा व मुदतवाढीची मागणी केली असून यासोबतच तूर खरेदी सुद्धा नाफेडने सुरु करावी अशी विनंती पत्राद्वारे केली.
नाफेडद्वारे चना खरेदीला दि. २६.०५.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदत वाढीनंतर अनेक शेतकरी आपला चना घेऊन नाफेड खरेदी केंद्रावर गेले असता नाफेडद्वारे चना खरेदीची मर्यादा न संपल्याने नाफेड खरेदी केंद्रावरील चना खरेदी थांबविण्यात आली व सध्या ती बंद आहे. याबाबत माहिती घेतली असता वर्धा जिल्ह्यातील एकूण ९००० शेतकऱ्यांनी नोंदणी केली, पैकी केवळ ४५०० शेतकऱ्यांचाच चना खरेदी करण्यात आलेला आहे. राज्यातील चना खरेदीची एकूण वाढीव मर्यादा वाढीव सह ८१९८८२ मे. टन होती ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांचा चना खरेदी अभावी पडून आहे. विशेष म्हणजे ४ ते ५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणीच केली नाही त्यांचाही चना खरेदी अभावी पडून आहे.
अमरावती जिल्ह्यात जवळपास हीच परिस्थिती असून एकूण १९५९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ४४७९ शेतकऱ्यांचे १२०३२५ मे. टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. तर उर्वरित ७११९ शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही चना खरेदी करण्यात आला नाही. नोंदणी न झालेल्यांची आकडेवारी वेगळीच आहे. खरेदी करीता मुदतवाढ देऊनही खरेदीचा इष्टांक संपल्याने नाफेडद्वारे चना खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर चना नाफेड केंद्रावर विकता आला नाही तर तो खाजगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहणार नाही व यात शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून दरात मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.
तरी शेतकऱ्यांची चना खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्याचे दृष्टीने नाफेड खरेदी केंद्रावरील खरेदीचा इष्टांक व त्यासोबतच संपूर्ण शेतकरी वर्गाचा माल खरेदी केला जाईल अशा सोयींची मुदतवाढ देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांची तुरीचे पिक निघून बराच कालावधी होऊन सुद्धा नाफेडने अजूनही तूर खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे खाजगी व्यापाऱ्यांना तूर विकणे सुरु केले आहे. त्यात तुरीच्या दरात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तरी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याचे दृष्टीने नाफेडने तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे अशी विनंती खासदार अमर काळे यांनी केली आहे.