वडगाव खुर्द येथे आगीत भस्मसात झालेल्या घरांना खासदार अमर काळे यांनी दिली भेट

शासकीय मदत मिळण्याकरीता अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कुटूंबीयांचे केले सांत्वन
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू तालुक्यातील वडगाव (खुर्द) येथे रात्रीच्या सुमारास परांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत श्री. प्रवीण झामरे व श्री. गोपाल झामरे यांचे घर जळून खाक झाले. यात घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्म झाले. केवळ कुटुंबीयांनी अंगात घातलेले कपड़े तेवढेच काय ते शिल्लक राहीले. यासह बाजूला असलेला मोहन खोंडे यांचा गुरांचा गोठा सुध्दा जनावरांच्या चाऱ्यासह जळून खाक झाला. श्री. खोडे यांच्या गोठयात जनावरे बांधलेली होती.

या जनावरांना सुध्दा आगीच्या झळा लागल्या. जनावरांना झालेल्या जखमांवर वेळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आले. प्राप्त माहीती नुसार श्री. प्रवीण झामरे यांनी बचत गटाकडून कर्ज काढले होते व ते पैसे सुध्दा घरातच होते ते सुध्दा आगीच्या भक्षस्थानी पडले अशी प्रथम दर्शनी माहीती गावकऱ्यांकडून मिळाली.

संपूर्ण कुटूंब गाढ झोपेत असतांना ही आग लागली. केवळ श्री. शामरे यांचेकडील लहान मुलगी काही कारणाने झोपेतून जागी झाली असता तिला ही आग दिसली व तिने सर्व कुटूंबाला जागे करून मोठया समयसुचकतेने पराच्या बाहेर काढले. घरात गॅस सिलेंडर सुध्दा असल्याने त्याचा सुध्दा स्फोट झाला. शामरे कुटूंबीयांचे दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी या आगीत झाली नाही हे सुदैवच म्हणावे लागेल.

खासदार श्री. अमर काळे यांना सदर बाब समजताच त्यांनी तात्काळ आपला दौरा रद्द करुन तातडीने सेलू तालुक्यातील वडगाव खुर्द गाव गाठले व आगीच्या भक्षस्थानी गेलेल्या बेचिराख झालेल्या घरांची पाहणी केली. नायब तहसिलदार श्री. ठाकरे यांचेशी तसेच कृषी अधिकारी श्री. राऊत यांचेशी चर्चा करून आगीत झालेल्या नुकसानीचा इतंभूत पंचनामा करून कुटुंबीयांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल याबाबत चर्चा केली व नुकसान भरपाईचा प्रस्ताव तातडीने पाठवून आपातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी दोन्ही कुटूंबातील सदस्यांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले इतकेच नव्हेतर आगीत जखमी झालेल्या जनावरांची सुध्दा दखल घेतली. यावेळी श्री. शेखर शेंडे, काशीनाथजी लोणकर, सचिन पारसे, हरीश पारसे, सौरभ शेळके यांचेसह गावातील मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *