आर्वीत वाहतूक नियम तोडणाऱ्यांना दणका

जीवन सुरक्षा अभियानात २३७ वाहनांवर कारवाई; ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड

आर्वी : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जीवन सुरक्षा अभियानांतर्गत आर्वी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई काल दिनांक २ ऑक्टोबरला केली. वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा आणि आर्वी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २३७ वाहनांवर चलनाची कारवाई करण्यात आली असून, ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पोलिसा अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. आर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांच्या जिविताची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान रस्त्यावर वाहने उभी करणे, अनधिकृत पार्किंग, विनानंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट प्रवास, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर व प्रेशर हॉर्नचा वापर यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई ठाणेदार सतीश डेहणकर त्यांच्या नेतृत्वात स.फौ अनिल तिवारी, स.फौ शेडमाके, स.फौ. ढोळे, पो.हवा रोशनी, पो.शि कोमल, पो.शि प्रमोदीनी, वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा तसेच पो.शि. प्रदीप खंडाळे, पोलीस स्टेशन आर्वी यांनी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *