शेतकऱ्यांनी खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एआय विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा (जिमाका): निसर्ग बेभरवशाचा झाल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या संकटातून दूर जाण्यासाठी शेतकऱ्यांनी निराश न होता उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एआय (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर व नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास शून्य खर्च जास्त उत्पादन मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सेलू येथे मानस ॲग्रो इंडस्ट्रीज ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने माहेश्वरी मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, संजय गारे, सुधीर दिवे, अनिल जोशी, नंदकिशोर खोडे आदी उपस्थित होते. येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासोबत शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता भासणार असून यासाठी गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतातच आणि शेतातील पाणी जमिनीत अशी जलनिती अंगीकारावी लागेल. बळीराजा सुखी समृद्ध व्हावा यासाठी शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यासाठी विविध योजना राबवित आहे.

प्रत्येकाने ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करायचे असेल तर तंत्रज्ञान स्विकारले पाहिजे. एआयचा वापर करून इलेक्ट्रिक ड्रोन, इलेक्ट्रिक डॉक्टरचा वापर केल्यास शून्य खर्च करण्यास मदत होणार आहे, असे पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले. बारामती येथील संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल. ऊसापासून इथेनॉल तयार केल्यास वाहनांमध्ये इथेनॉलच्या वापरातून भारत देश हा एक दिवस इंधन दाता, ऊर्जा दाता होऊन स्वयंपूर्ण होईल. ऊसाच्या चाऱ्यामुळे दुग्ध उत्पादनाला सुद्धा चालना मिळून दुग्ध उत्पादन वाढविण्यात मदत होईल.

शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकांवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल करावा, असेही आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले. नॅनो खते, मिश्रित खते तसेच प-हाटी पासून तयार करण्यात येत असलेल्या ऑर्गॅनिक कार्बन व ऑर्गॅनिक खताचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास शेती खर्च कमी करता येतो, असेही पुढे बोलताना श्री. गडकरी म्हणाले. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते उच्चांक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *