वर्धा नगर परिषदेमध्ये खळबळ, लाच दिल्याशिवाय होत नाही कोणतीच कामे
वर्धा : वर्धा नगर परिषद भ्रष्टाचाराच्या आहारी गेली असून पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही, असे नागरिकांचे म्हणणे असताना नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या कुजबुजीला अखेर मंगळवारी सायंकाळी ठोस पुराव्यांची जोड मिळाली. विकासकामांच्या नावाखाली ‘लक्ष्मी दर्शन’ घडवून आणण्याचा उद्योग करणारा बांधकाम विभागातील अभियंता संदीप डोईजळ हा तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. या धडक कारवाईने नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून नगर परिषद प्रशासनातून अधिकारी, कर्मचारी या कारवाईने धास्तावले आहेत.
प्रशासकीय राजवटीच्या काळात नगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यानंतर लोकप्रतिनिधी सत्तेवर आले, मात्र भ्रष्टाचाराची साखळी तुटली नसल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. नागरिकांची कामे, विकासकामांची देयके आणि इस्टिमेट मंजुरीसाठी ‘वजन’ ठेवावे लागते, अशी ओरड सुरू असताना एसीबीने थेट कारवाई करून भ्रष्ट व्यवस्थेच्या चेहऱ्यावरचा मुखवटा फाडला आहे. माहितीनुसार, एका विकासकामाच्या देयकाचे इस्टिमेट तयार करण्यासाठी डोईजळ यांनी संबंधित ठेकेदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ठेकेदाराने लाच देण्याऐवजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी नागपूरहून आलेल्या अधिकाऱ्यांनी वर्धा नगरपालिका परिसरात कारवाई केली. डोईजळ यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर नगरपालिकेतील इतर संशयास्पद व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकच मासा जाळ्यात सापडला की संपूर्ण तळेच गढूळ आहे, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. एसीबीच्या कारवाईने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नगरपालिकेतील इतर प्रकरणांचीदेखील चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.