नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या १७ सप्टेंबरपर्यंत अपलोड करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व तातडीने पुर्ण करून शेतकऱ्यांच्या याद्या १७ सप्टेंबरपर्यंत पोर्टलवर अपलोड करा आणि या शेतकऱ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया गतीने पुर्ण करून मदतीचे वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व मदत वाटपाचा पालकमंत्रींनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वामसीम सु, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताले, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरूद्ध राजुरवार, बांधकामाचे कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, नायब तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला पालकमंत्रींनी शेतीपीकांच्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे पंचनामे करतांना एकही शेतकरी सुटू नये. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः फिल्डवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या मुदतीत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करा. शेतकऱ्यांच्या खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे असल्याने विशेष मोहिम राबवून गतीने हे काम पुर्ण करा. नुकसानग्रस्तांना आवश्यक निधी तातडीने देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे ही संपुर्ण प्रक्रिया लवकरात पुर्ण होवून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी पोहोचला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात जुन ते ऑगस्ट या तीन महिन्यात १२ हजार ७५५ शेतपीकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या १ हजार ९० हेक्टर शेतकऱ्यांना वाटपासाठी ७ कोटी ७३ लाख इतका निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांना सदर वाटप तातडीने करण्यात यावे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचे ७५ टक्के पंचनामे पुर्ण झाले आहे. त्यानुसार ३१ हजार ३१० शेतकऱ्यांचे २२ हजार १९० हेक्टरवर नुकसान झाले आहे. यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व पंचनामे पुर्ण करून मदत वाटपाच्या पुढील कारवाईस गती देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *