अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार
वर्धा, दि.17 (जिमाका) : ग्रामीण भागातील पंचायतराज व्यवस्था अधिक मजबूत व्हावी आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा मिळेल, नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील आणि ग्रामीण भाग अधिक सक्षम बनेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम सालोड (हिरापूर) येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, सालोडचे सरपंच अमोल कन्हाके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, उपसरपंच आशिष कुचेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ.भोयर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसे मिळणार आहे. सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकसहभागातून गावाचा विकास कसा साधता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी महत्वाकांक्षी योजना सुरू केली. आगामी काळात ग्रामीण भागात पतसंस्था देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील पैसा गावातच राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. आपल्या ग्रामपंचायतीने चांगले काम केल्यास नक्कीच बक्षीस मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याहस्ते सालोड ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घराची चाबी व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे प्रमुख घटक सुशासन युक्त पंचायत तयार करणे, स्वनिधी व सामाजिक दायित्व निधीतून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावातील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान यांच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हे आहेत.
या अभियानांतर्गत गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात गावांमधील पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती अशा बाबींचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचे 100 गुणांचे मूल्यांकन होईल. मुल्यांकनामध्ये गावातील स्वच्छतेपासून ते पाणी व्यवस्थापनापर्यंत, आरोग्य सुविधांपासून ते शिक्षणापर्यंत अनेक बाबींचा समावेश असेल. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले जाणार आहे.