पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भुजाडे कुटुंबाला सांत्वनपर भेट;तातडीने मदत देण्याचे निर्देश

​वर्धा, दि. १४ (जिमाका) : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाचणगाव येथील बढे प्लॉटमधील घराची पडझड झाली. या दुर्दैवी घटनेत भुजाडे कुटुंबातील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार राजेश बकाने यांनी भुजाडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

​या भेटीदरम्यान पालकमंत्री डॉ.भोयर यांनी पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. या कुटुंबाला घरकुल मंजूर असल्याने, प्राधान्याने घराचे बांधकाम सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच, इतर शासकीय योजनांचा लाभही प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

​यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, संजय गाते, मंगेश झाडे, प्रशांत इंगोले, अरविंद भार्गव, माजी नगरसेवक आशीष गांधी, पुलगावच्या अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *