भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात वर्ध्यातून आवाज
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : सह्याद्री पर्वतरांगेतील भीमाशंकर परिसरात टॉरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात हरितक्रांती मंचाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विकासाच्या नावाखाली जंगलांचा ऱ्हास करून जैवविविधता धोक्यात आणणे योग्य नसल्याचे स्पष्ट करीत मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी, वर्धा यांना निवेदन देऊन वृक्षतोडीच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करूनच विकासकामे राबवावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे, या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यात या वनसंपत्तीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जंगलांमुळे प्रदूषणाचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. अशा संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास पर्यावरणाचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी नको
विकासाला विरोध नसून नैसर्गिक संपत्तीचा विनाश करून होणारा विकास मान्य नसल्याची भूमिका हरितक्रांती मंचाने मांडली. ऊर्जा प्रकल्पांसाठी घनदाट जंगलांची निवड करण्याऐवजी योग्य पठारी किंवा बिगरवनक्षेत्राचा पर्याय तपासण्यात यावा. सौरऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक जागा जंगलाबाहेर उपलब्ध करून, तेथून निर्माण होणारी ऊर्जा संबंधित पंपहाउसपर्यंत पोहोचविण्याच्या पर्यायाचा विचार करावा, अशी सूचना निवेदनातून करण्यात आली.
शासनाने या प्रकल्पाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून पुनर्विचार करावा, वृक्षतोडीमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा गांभीर्याने विचार करावा आणि सह्याद्रीच्या वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनप्रसंगी डॉ. राजेश आसामवार, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुरलीधर बेलखोडे, पाटणकर, रिजवान पठाण, श्याम लंगडे, सुधीर देशमुख, प्रमोद खोडे, संगीता चावरे, बडगैया, प्रवीण पेठे, सचिन धांदे, सुनील ढाले, हेमराज भगत, किशोर पोफळी, रविकांत पाटील, विजय बोभाटे, सूरज बोदिले आणि प्रल्हाद मानकर यांच्यासह हरितक्रांती मंचाचे सदस्य उपस्थित होते.