महायुतीत भाजपकडे वर्धा जिल्ह्याच्या चारही जागा आल्यात. त्यात वर्धा विद्यमान आमदार पंकज भोयर, हिंगणघाट विद्यमान आमदार समीर कुणावार, तर देवळी येथून राजेश बकाणे यांनाउमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र भाजपचा आर्वीचा तिढा कायम होता. आर्वी मतदारसंघातून सुमीत वानखेडे की आमदार दादाराव केचे असाप्रश्न निर्माण होत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर येथून सुमीत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष करत वानखेडे यांचे स्वागत केले. एकीकडे वानखेडे यांच्याउमेदवारीचे स्वागत करण्यात येत असताना दुसरीकडे केचे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात आमदार केचे यांनी शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, सुमीत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करत उमेदवारीवरील चर्चांना विराम मिळाला. लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले असले तरीही केचे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने आर्वीत महायुतीत बंडखोरी होईल काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यात आमदार केचे शांत होत पक्षाचे काम करणार की बंडखोरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आर्वीत आमदार केचेंना डच्चू ; भाजप कार्यकर्त्यांत असंतोष
प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघ महायुतीकरिता अवघड जागेचे दुखणे ठरले होता. अखेर येथे विद्यमान आमदार दादाराव केचे यांना डच्चू देत महायुतीच्यावतीने भाजपचे सुमीत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याचे चित्र दिसत असले तरी आमदार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने बंडखोरी तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महायुतीत आर्वीमध्ये तर वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत आहेत. वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट या चारही विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यात आर्वी विधानसभा मतदारसंघात महायुतीत तर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची तिढा मोठ्या प्रमाणात ताणला गेला. लवकर पेच सुटत नसल्याने आणि कोण उमेदवार रिंगणात राहणार, याबाबत सर्वांचीच उत्सूकता शिगेला पोहोचली. तिकडे कार्यकर्त्यां मध्येही संभ्रम निर्माण होऊ लागला. त्यात महाविकास आघाडीने देवळीतून काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे, वर्ध्यातून शेखर शेंडे, आर्वीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मयूरा काळे, हिंगणघाट येथून अतुल वांदिले यांना उमेदवारी देण्यात आली.