कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय रद्द करा!

देवळीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होली

 प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

देवळी : केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करून या निर्णयाला डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याचा निषेधार्थ आज गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालय, देवळी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष तथा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांचे नेतृत्वात शेतकरी बांधवांनी शासन निर्णयाच्या (राजपत्र) प्रतींची होळी करून केंद्र सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर तहसीलदार देवळी यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणात स्वस्त कापूस भारतात आयात होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. आधीच शेतीचा वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि बाजारभावातील अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आयात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. परिणामी, देशांतर्गत कापसाचे बाजारभाव कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यांच्या शेतीमालाला संरक्षण मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताविरोधात घेतलेले निर्णय शासनाने मागे घेतले पाहिजेत, अशी भूमिका यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचे वतीने मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी हा लढा यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रवीण कात्रे, संदीप दिघीकर, मनोज नागपुरे, प्रवीण खाडे, सुधीर भगत, गजानन ताकसांडे, शैलेश फुणसे, रामेश्वर जिवणे, निलेश बोटफोले, अविनाश आठबले, संकेत हांडे, प्रशांत केने, खुशाल साळुंखे, इरफान शेख, शुभम गोडे, महेश खाडे, सुमित झोरे, शहाबाज शेख यांच्यासह इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *