जिल्ह्यातील ४४ १५१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना योनेजेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

वर्धा (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार ७१० शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजार ८३० शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीसाठी पात्र ठरली असून त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी संदेश पाठवण्यात आले आहेत. ४ नोव्हेंबर रोजी शासनाने १२ हजार ६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १२९ कोटी ७५ लाख रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४४ हजार १५१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४४१ कोटी ८६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पोर्टलवर पात्र ठरलेल्या ६० हजार ८३० शेतकऱ्यांपैकी १३ हजार ५७७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सर्व तहसीलं कार्यालये, सहायक निबंधक कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तलाठ्यांकडेही उपलब्ध आहे. ज्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर संदेश प्राप्त झाला आहे, त्यांनी आधार कार्ड आणि अॅग्री स्टॉक क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएसजी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्यानंतर आधार, बँक खाते अथवा रक्कम यांची वैधता निश्चित केली जाईल.

सीएसजी केंद्रावर आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेत जाऊन मृत्यूची नोंद करून घ्यावी. त्यानंतर बँकेच्या नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. मृत शेतकऱ्यांच्या आधार अमान्यतेची माहिती डीएसीकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच सर्व ई-सेवा चालकांना शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण विनामूल्य करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी सीएसजी किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *