आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

पालकमंत्र्यांकडून पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा
वर्धा (जिमाका) : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करतो. तालुकास्तरावर आमदारांच्या सूचनेप्रमाणे तयार झालेल्या आराखड्यानुसार टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीच्यावतीने तालुक्यातील पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. या आढावा याठिकाणी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व तालुकास्तरीय सर्व यंत्रणा उपस्थित असते. या बैठकीत तालुक्यातील संभाव्य टंचाईचा आढावा घेऊन टंचाई निवारणाचा आराखडा व कामे प्रस्तावित केली जातात. ही सर्व कामे कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित असते, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

ग्रामपंचायत स्तरावर आणि जिल्हास्तरावर निविदा प्रक्रिया राबवून करण्यात येणारी टंचाई कामे तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी गावनिहाय कामांचा आढावा घेतला पाहिजे. पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याने प्रत्येक कामाचा तालुका व जिल्हास्तरावर आढावा घेण्यात यावा. यासाठी एका अधिकाऱ्यांची पर्यवेक्षणासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने २७२ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी १३९ कामांचे करारनामे करून कामे सुरु करण्यात आली आहे. विभागस्तरावर ६५ निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. टंचाई कामांमध्ये पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, खाजगी विहिरींचे अधिग्रहण अशा कामांचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्र्यांनी ऑनलाईन स्वरुपात उपस्थित असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांकडून तालुुकानिहाय मंजूर कामे, कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. आराखड्याप्रमाणे मंजूर सर्व कामे याच वर्षात आणि कालमर्यादेत पूर्ण होतील, याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची राहणार असल्याचे सांगितले. सुरुवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी टंचाई आराखडा तसेच कामांची माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *