ऐतिहासिक वारसा वाचवण्याची मागणी
(अभय बेदमहोता)
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
सेलू : सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथील रेल्वे पात्रीच्या मध्यमाथ असणारी जागृत देवीची प्राचीन मूर्ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. ही मूर्ती श्री चामुंडा, मातृका देवी अथवा महिषासुरमर्दिनीचे प्राचीन रूप असून, १० व्या ते १२ व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी शैलीचा हा उत्कृष्ट नमुना आहे. काळ्या बेसाल्ट दगडावर कोरलेली ही मूर्ती सुमारे ७०० ते १००० वर्ष जुनी असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
या प्राचीन मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्या डोक्यावर उंच करंड मुकुट (राजमुकुट) असून चार भुज्यांमध्ये त्रिशूल व परशु सदृश्य आयुध आहे. बसलेली स्थिती आणि दागिने हे देवीच्या रक्षक स्वरूपाचे लक्षण दर्शवतात. कुशल कारागिराने काळ्या बेसाल्ट पाषाणावर ही कलाकृती साकारली असून, पाठीमागे प्रभामंडळ आहे. विशेष म्हणजे, आजही या मूर्तीवर कुंकू आणि गुलालची पूजा केली जात असून गावकऱ्यांया मूर्तीवर प्रगाढ श्रद्धा आहे. रेल्वे लाईन टाकताना ब्रिटिश काळाटही गावकऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करून ही मूर्ती स्थित ठेवली होती.
सध्या परिसरात रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरू असल्याने या प्राचीन मूर्तीच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. सुधीर लिंगे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन योग्य पाऊल उचलले आहे. पुरातत्व विभागाच्या दृष्टीने हा अनमोल वारसा सुरक्षित राहावा, यासाठी गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने खालीलप्रमाणे पावले उचलणे गरजेचे आहे.
कायदेशीर व प्रशासकीय पत्रव्यवहार:
जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव सादर करावा.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI), नागपूर मंडळ यांना लेखी निवेदन द्यावे.
डीआरएम (DRM), मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांना पत्र देऊन मूर्तीची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
ग्रामस्थांची भूमिका व उपाययोजना करत
दहेगाव गोसावी ग्रामपंचायतीने ठराव करावा की, ‘ही आमची प्राथमकता असून ती आहे तिथेच जतन करण्यात यावी. रेल्वे लाईनच्या अलाइनमेंटमध्ये बदल करावा किंवा मूर्तीभोवती संरक्षक भित बांधावी.’
मूर्तीचे चोहोबाजूने फोटो, लोक पूजा करत असतानाचे छायाचित्र्रे आणि ज्येष्ठांचे जबाब व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करावेत. निवेदनावर गावातील ५० ते १०० नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार आणि रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाला सोपवावे.
अमळनेरच्या सती माता मंदिराप्रमाणेच, रेल्वे रूळांच्या मधोमध्य मंदिर असतानाही मार्ग बदलल्याची उदाहरणे आहेत.
दहेगाव येथेही रेल्वे प्रशासन दोन पर्याय स्वीकारू शकते ते असे की, मूर्तीभोवती छोटे संरक्षक कंपाउंड किंवा रेलिंग बनवून ती आहे तिथेच जतन करणे.
अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत, गावकऱ्यांच्या उपस्थितीत आणि पुरातत्वीय नियममानुसार शास्त्रोक्त पद्धतीने त्याच परिसरात १०-१५ फूट बाजूला योग्य त्या विधिनुसार मूर्तीचे पुनर्रस्थापना करणे. (यासाठी जेसीबीसारख्या यंत्राचा वापर करून मूर्तीला हानी पोहोचवू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे).
हा आपला अमूल्य सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असून, तो नष्ट होऊ नये यासाठी दहेगाव गोसावी येथील ग्रामस्थांनी व प्रशासनाने संयुक्तपणे वेळेची पावले उचलणे गरजेचे आहे.