वर्ग ६ ते ८ वर कार्यरत शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळणार!

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची हमी

प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास समितीच्या सकारात्मक अहवालानुसार शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील वर्ग ६ ते ८ कार्यरत सरसकट सर्व शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबतची मागणी प्रहार शिक्षण संघटनेच्या वतीने विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना देण्यात करण्यात आली. याबाबत शिक्षण सचिव यांना शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत आदेश दिल्याने लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल अशी हमी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

राज्यातील ६० हजार अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना वाढीव टप्प्याबाबत सातत्याने आंदोलन सुरू आहे. शासनाच्या वतीने १० जुलै २०२६ रोजी आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनात दिलेल्या शब्दांनुसार मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव टप्पा मान्य करून राज्यातील अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. २०२२-२३ च्या संच मान्यतेमध्ये शेवटच्या वर्गाची पटसंख्ये अभावी अपात्र करण्यात आलेल्या शाळांना संच मान्यता २३-२४ किंवा २४-२५ च्या संच मान्यतेमधील पदे ग्राह्य धरून वाढीव अनुदान देण्यात यावे, राज्यभर शिक्षण विभागात लोकसेवा हमी कायद्याची होत असलेली प्रभावी अंमलबजावणी व त्यातून होत असलेल्या अनियमितता, राज्यातील सर्व शाळांना एफएसएसएआय नोंदणी परवाना बंधनकारक करण्यात येऊ नये, कनिष्ठ महाविद्यालयातील आय टी विभागाचे शिक्षक आय टी विषय सुरू केल्यापासून २००१ पासून विनाअनुदान तत्त्वावर काम करीत आहे, डिजिटल इंडियाच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षक अल्पशा मानधनावर काम करीत असल्याने त्यांना नियमानुसार वेतन वेतन देण्यात यावे आधि मागणी यावेळी करण्यात आल्या.

यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक नागतोडे, सचिव मुकेश इंगोले, उच्च माध्यमिक विभागप्रमुख कुंडलिक राठोड, गजानन साबळे, निलेश डहाके, परमेश्वर केंद्रे, प्रमोद जामूनकर, नरेंद्र ढोरे, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मनीष मारोडकर, सचिव शैलेश भोसले, संघटक अजय थुल, प्रशांत चौधरी, पंकज खोपे, राहुल धांदे, मनोज भुसारी आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *