कविसंमेलन, कथाकथन रंगले – गीतगायनाने संमेलनाची सांगता
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : कथाकथन, परिसंवाद, व्याख्यान, कविसंमेलन अशा वैविध्यपूर्ण व दर्जेदार उपक्रमांमुळे पूर्णत्व लाभलेल्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या दोन दिवसीय जागृत दृष्टी साहित्य संमेलनाची सांगता सुरेल गीतगायन मैफलीने करण्यात आली.
स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात आयोजित या संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’ या नागपूरच्या विधि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिरीष देशपांडे यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तकावर परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादात डॉ. विनिता हिंगे यांनी मोजक्या व प्रभावी शब्दात या पुस्तकातील भावविश्व उलगडले. यावेळी प्रा. डॉ. शीला शिरीष देशपांडे आणि भावना खरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
द्वितीय सत्रात ज्येष्ठ हिंदी कथाकार घनश्याम आसुदानी (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बहुआयामी कथाकथनात रेवानंद मेश्राम (चंद्रपूर), अभिजित डाखोरे (हिंगणघाट), प्रा. डॉ. सुचिता ठाकरे, प्रा. मीनल रोहणकर व साधना उमाळकर यांनी ओघवत्या शैलीत कथा सादर केल्या.
सायंकालीन सत्रात ज्येष्ठ गझलकार व लेखक काशिनाथ महाजन (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलन घेण्यात आले. या काव्यसत्राचे रंगतदार सूत्रसंचालन गझलकार विद्यानंद हाडके व प्रवीण कांबळे यांनी केले. कविसंमेलनात ज्ञानेश्वर वऱ्हाडे (वाशिम), गंगाधर मुटे (आर्वी छोटी), प्रीती तडस वाडीभस्म, मंजुषा ठाकरे चौगावकर, कविता बेदरकर, वृषाली मरतोडे, राहुल राऊत, स्वाती संगरे (वर्धा) ?डॉ. इब्राहिम बख्श आझाद, नरेंद्र अंधारे (हिंगणघाट), सुरेश सुरुजुसे (करंजी काजी), गझलकार अजीजखान पठाण, राजेंद्र कांबळे, छत्रपाल तामगाडगे, सुरेश वंजारी, सूर्यकांत मुनघाटे, चरणदास वैरागडे, नरेश पाटील, शरद कांबळे (नागपूर) यांनी दर्जेदार कविता व गझल सादर करीत रसिकांची दाद मिळवली. संमेलनाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनीही यावेळी हिंदी काव्यरचना सादर केली.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सिनेनाट्य दिग्दर्शक तथा नाम फाउंडेशनचे समन्वयक हरिश इथापे यांनी ‘मन, मेंदूला अनलॉक करू या’ या विषयावर प्रेरणादायी संवाद साधत नवोन्मेषशाली विचारांची मांडणी केली.
संमेलनाच्या समारोप सत्रात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सहभागी साहित्यिक व आयोजन समितीतील कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संमेलनाची सांगता ‘सूरसंगम गीतगुंजन’ मैफलीने झाली. या कार्यक्रमात जियाउद्दीन शेख (नागपूर), पूजा शेंद्रे (यवतमाळ), लीला लाकडे (चंद्रपूर), प्रशांत देऊळकर (वर्धामनेरी) यांच्यासह संगीता इंगळे, ज्योती भगत, मकरंद उमाळकर यांनी सुरेल गाणी सादर केली.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष भोजराज पाटील, महासचिव डी. पी. जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र देवरे, कोषाध्यक्ष डी. एन. मरडे, राष्ट्रीय सचिव जगदीप कबाळ, संमेलन समन्वयक नरेंद्र नरोटे यांनी परिश्रम घेतले. दृष्टीबाधित आणि दृष्टीवान अशा दोन्ही साहित्यिकांचा मेळ घालत वर्ध्यात आयोजित या पहिल्या राज्यस्तरीय जागृत दृष्टी साहित्य संमेलनाने डोळस साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले.