वर्धा (जिमाका): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्याने लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्या-त्या गावातील अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभ बंद झालेल्या, यादीतील महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र व स्वयंघोषणापत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला आर्थिक लाभ देण्यासाठी पात्रता, अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार योजनेतील पात्र लाभार्थी महिलेला आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे दरमहा आर्थिक लाभाची रक्कम अदा करण्यात येते.
डिसेंबर महिन्याअखेर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचा लाभ बंद झाल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहे.