आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
वर्धा (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी व आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा या निवडणुकीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वानमथी सी यांनी आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावीत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाइन उपस्थित होते.
आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके तातडीने गठीत करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
आचारसंहिता काळात आधीपासूनच सुरु असलेली विकास कामे सुरु ठेवता येतील, नव्याने विकास कामांना आदेश देता येणार नाही किंवा कामे सुरु करता येणार नाही. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना प्रशासकीय मान्यता आचारसंहिता काळात देता येणार नाही, परंतु विभागांनी कामांची कागदोपत्री प्रक्रिया करून ठेवावी. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच मान्यता व कामे सुरु करता येतील, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी त्यांनी निवडणूक तयारीचा देखील आढावा घेतला. मतदान केंद्र, केंद्रावरील सुविधा, मतदान पथके, सुरक्षा व्यवस्था, मतपेट्यांची वाहतूक, कर्मचारी नियोजन आदींचा आढावा घेत जिल्ह्यात या निवडणुकीची प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग होतील असे पोस्टर, बॅनर तत्काळ काढण्याचे सांगितले.
राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक
पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. जिल्ह्यात ही निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासोबतच अधिकाधिक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.