सावंगी, सेलू ठाण्याच्या हद्दीतील घटना
दुसऱ्या अपघातात जीवितहानी टळली
वर्धा : समृद्धी महामार्गावर सावंगी आणि सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दोन वेगवेगळे अपघात झाले, यातील एका अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत धावत्या कारचा मागील टायर फुटल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने दुसऱ्या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवरील चेनेज क्रमांक ६२/१०० येथे शनिवारी दुपारी पहिला अपघात घडला. ठाणे येथील भाईंदर-मिरा रोड परिसरातील रहिवासी मुरली कृष्णा सुरेंद्र बाबू जोनाला (वय ५५) हे एम.एच. ०२ सी.झेड. ५५२७ क्रमांकाच्या कारने मुंबईहून नागपूरच्या दिशेने प्रवास करीत होते. कार चेनेज क्रमांक ६२/१०० परिसरात आली असता त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले.
वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना कार तिसऱ्या लेनमध्ये धावणाऱ्या वाहनाला जाऊन धडकली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. चालक कारमध्ये गंभीररीत्या अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांच्या एपीआय सरिता यादव, पीएसआय प्रकाश चौधरी, पोलीस कर्मचारी हाडके, इंगळे आणि अन्य दोन जवान घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने चालकाला कारमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी सावंगी मेघे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.