‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान गावागावांत राबवणार

काँग्रेसच्या नागपूर विभागाच्या केंद्रीय निरीक्षक अमी याज्ञिक यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : मतदार यादीतील कथित घोळ, मतदारांची नावे वगळणे, नवीन नावांचा समावेश आणि मतदान केंद्रांमध्ये होणारे बदल या मुद्द्यांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गावागावात पोहून ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नागपूर विभागाच्या केंद्रीय निरीक्षक अमी याज्ञिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची पडताळणी करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. मतदार यादीतून नावे नेमकी कोणत्या कारणांमुळे वगळली जात आहेत, मतदान केंद्रांमध्ये बदल का केले जात आहेत, याबाबत निवडणूक यंत्रणेने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी याज्ञिक यांनी केली.

मतदान हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असून, प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाची संधी मिळाली पाहिजे. मात्र, मतदार यादीतील कथित अनիմితतेमुळे मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होत असल्याची चिंता काँग्रेसने व्यक्त केली. या संपूर्ण प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी जनतेला स्पष्ट आणि समाधानकारक उत्तर द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रकरणातील पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. मतदार यादीतील कथित घोळची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका पक्षाने मांडली.

सद्भावना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोले, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अभ्युदय मेघे, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुणा धोटे, सोनाली कोपुलवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

एसआयआर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात लाखो मतदारांची नावे वगळल्या गेली. मागील विधानसभांत ३२ लाख मतदार वाढले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार झाले, ही मतदारसंघात वाढली कशी, याचे उत्तरही मिळाले पाहिजे, असेही यावेळी याज्ञिक म्हणाल्या.

जिल्ह्यातील ५० पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची चमू ही मोहीम महिनाभर राबविणार आहे. आगामी काळात गावागावांत आणि बूथ स्तरावर माहिती संकलित करून मतदार यादीबाबत जनजागृती करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *