सहा वर्षांसाठी हकालपट्टी, महाविकास आघाडीविरोधातील उमेदवारी भोवली; पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा पक्षाकडून ठपका
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने नितेश कराळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्यावतीने नितेश कराळे यांना सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले आहे. पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पक्षाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
वर्ध्यातील नितेश कराळे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत अपक्ष रिंगणात उतरले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभिजीत वंजारी निवडणूक लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यांच्याविरोधात नितेश कराळे रिंगणात उतरले. कराळे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा संभ्रम मतदाताओंमध्ये निर्माण करत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्याचे सांगण्यात आले. पक्षाची शिस्त, धोरणे, महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन करणारी ही बाब असून पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे सहा वर्षाकरिता पक्षातून निष्कासीत करण्यात येत असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नितेश कराळे यांच्याकडे पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून पद होते. अशात नितेश कराळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. दरम्यान, पक्षाच्यावतीने २२ ऑक्टोबर रोजी नितेश कराळे यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नितेश कराळे यांच्यावर कारवाईचे पत्र पुढे येताच राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ निर्माण झाली.
पक्षाने केलेली कारवाई चुकीची आहे, असे असले तरी कारवाईचा स्वीकार करतो, पक्षाचे मोठ्या प्रमाणात काम केले, चांगल्या कार्यचा हा सत्कार असल्याची प्रतिक्रिया नितेश कराळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.