मृतदेहवर लवकर अंत्यसंस्कार करावे : जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वर्धा : जिल्ह्यातील रायपूर जंगली शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेला पाच दिवसांवर कालावधी होत आहे. मात्र अंत्यसंस्कार झालेले नसून मृतदेह शवागाारात आहे. प्रशासनाकडून स्थानिक समिती, गावकरी, सामाजिक संघटना, नातलग, कुटुंबीयांशी संवाद साधण्यात येत आहे. प्रशासन पीडित कुटुंबासोबत आहे. सतत पाठपुरावा करत चर्चा करण्यात येत आहे. मागण्यांबाबत प्रशासनाच्या वतीने नियमानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच इतर मागण्यांबाबत शासनाकडे माहिती पाठविण्यात आली आहे. मृतदेhावर लवकर अंत्यसंस्कार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय अधिकारी कुश मोटवानी, बोर अभयारण्याचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार, सहायक वनसंरक्षक दत्तात्रय लोंढे, तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. मृतदेhावर अंत्यसंस्कार करून घ्यावे, मागण्यांसंदर्भात चर्चा त्यानंतरही करता येईल. प्रशासन याबाबत संवेदनशील आहे. मागण्यांबाबत शासनाकडे माहिती पाठविण्यात आली आहे. पालकमंत्री, खासदार, लोकप्रतिनिधींनी माहिती देण्यात आली आहे. वनविभागाकडून एकास हंगामाचे आङ्वासन देण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मृतकाच्या वारसाला बचतगटाच्या माध्यमातून जिप्सी वाहन देता येऊ शकेल. कुटुंबिय, सरपंच, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा सुरू आहे. सकारात्मक तोडगा निघेल, असा आशावाद जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी व्यक्त केला.
सेलू तालुक्यातील रायपूर जंगली शिवारात शेतकरी भगवान ध्रुवे यांचा ९ सप्टेंबर रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेस पाच दिवसांचा कालावधी होत असताना अंत्यसंस्कार झालेले नाही. मृतदेह शवागारात आहे. नातेवाईकांसह गावकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र आहे. घटनेनंतर तातडीने प्रशासन घटनास्थळी पोहोचले. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनानंतर मृतदेह रायपूर येथे नेण्यात आला. अंत्यसंस्कारकरिता कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्यात आले, त्यानंतर गावकरी आणि परिवाराने अंत्यसंस्कारास नकार दिल्याने मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. पीडित परिवाराला १ कोटींची मदत, सदस्याला शासकीय नोकरी, गावाचे पुनर्वसन आदी मागण्या करण्यात आल्या. सर्वांची समजून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. वनविभागाकडून गस्त वाढविण्यात आली आहे. शेताचे रस्ते मोकळे करून देण्यात येत आहे. मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. असे बोर अभयारण्याचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी सांगितले.
मृतदेहाचा बाह्य वातावरणाशी संपर्क आला आहे. मृतदेह ठराविक काळ सुरक्षित ठेवता येतो. त्यामुळे मृतदेhावर तातडीने अंत्यसंस्कार करणे आवश्यक असल्याचे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.