जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ६०,७५३ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड

वर्धा (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

या योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राष्ट्रीयकृत, जिल्हा व खासगी बँकांकडून पीक कर्ज उचल केलेल्या आणि ३१ मार्च २०२६ रोजी थकबाकी असलेल्या कर्जदारांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेअंतर्गत २ लाखांवरील रकमेची प्रथम परतफेड करावी लागेल, त्यानंतरच त्यांना २ लाखांचा लाभ मिळेल. तसेच २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ८८२ शेतकऱ्यांची नवीन यादी प्राप्त झाली असून जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ६०,७५३ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर यासंबंधीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. संदेशप्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपलेसरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आधार कार्ड व श्री स्टॅक क्रमांकासह आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. हे आधार प्रमाणीकरण ई-सेवा केंद्रांवर मोफत केले जात असून ते पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

बँकांनी सुचवलेल्या हेअरकटच्या सूत्रानुसार एनपीए दिनांकाप्रमाणे कर्जमाफीची रक्कम निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२६ च्या थकीत रकमेपेक्षा कमी रक्कम जमा झाली तरी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही व बँकही त्याची मागणी करणार नाही. दरम्यान जिल्ह्यातील ज्या १८,११९ कर्ज खात्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांची यादी ग्रामपंचायत, चावडी, तलाठी, सहाय्यक निबंधक व बँकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हा उपनिबंधक व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. लाभ जलद गतीने मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *