पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जाणून घेतल्या आयसीआरपीच्या समस्या

वर्धा (जिमाका) : महिला समुदाय संशोधन व्यक्तींचे (आयसीआरपी) मानधन वाढ व विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बैठक घेतली. आयसीआरपीच्या विविध समस्या व मागण्यांसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू, असे यावेळी महिलांशी चर्चा करतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, संजय गांधी निराधार योजना वर्धा तालुका समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.

शासनस्तरावर प्रयत्न करून आयसीआरपीच्या महिलांचे मानधन वाढ करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. आयसीआरपीच्या महिलांनी बचत गटाची निर्मिती करावी. गट सक्रीय कार्यरत ठेवावा आणि बचत गटातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहतील यासाठी प्रयत्न करावे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आयसीआरपीच्या महिलांशी संवाद साधतांना सांगितले.

समुदाय संशोधन व्यक्तीच्या मानधनात वाढ, ऑनलाईन कामासाठी मोबाईल व मोबाईल रिचार्ज देण्यात यावा, मानधन थेट खात्यात जमा करावे, ड्रेसकोड व ओळखपत्र देण्यात यावे व प्रवास भत्ता देण्यात यावा इत्यादी मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याविषयावर पालकमंत्र्यांनी संवाद साधत मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

आयसीआरपीची नियुक्ती महिला बचत गटाशी समन्वय साधून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बचत गटाची चळवळ सुरू आहे. या गटांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. बैठकीला आरसीआरपीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *