-
उद्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक
-
मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी रवाना
-
सकाळी ८ ते ४ वेळेत होणार मतदान, यंत्रणा सज्ज
वर्धा (जिमाका) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. २३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रावर मतदान होणार असून सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजता पर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. जिल्ह्यातील २१ हजार ७४२ पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी केले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान केंद्रांमध्ये आष्टी येथे २ मतदान केंद्र, कारंजा ३, आर्वी ६, आंजी मोठी १, सेलू २, सिंदी रेल्वे १, सेवाग्राम १, वर्धा ११, पुलगाव २, देवळी २, समुद्रपूर २ व हिंगणघाट येथे ८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वर अशा २५० च्यावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मतदान केंद्रावर जिल्ह्यातील २१ हजार ७४२ पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १३ हजार १९ पुरुष मतदार, ८ हजार ६४३ महिला मतदार असे एकूण २१ हजार ७४२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही आवश्यक तयारी केली आहे. मतदान केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखणे, मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करून देणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने यंत्रणा सज्ज आहे