उद्घाटक ना. डॉ. पंकज भोयर, संमेलनाध्यक्षपदी संजय इंगळे तिगावकर
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र या अंधांच्या हितासाठी कार्यरत केंद्रीय संस्थेद्वारे पहिले राज्यस्तरीय जागृत दृष्टी साहित्य संमेलन दि. २४ व २५ रोजी स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्षपदी ख्यातनाम कवी व लेखक संजय इंगळे तिगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ना. पंकज भोयर, संजय इंगळे तिगावकर, केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कृत मानसोपचार तज्ज्ञ प्रा. डॉ. विनोद आसुदानी, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे राज्याध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष भोजराज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी ब्रेल पुस्तक व जागृती दीपावली विशेषांकाचे अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात दुपारी १२ वाजता ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’ या प्रा. शैला शिरीष देशपांडे यांचे आत्मकथन असलेल्या व सुषमा देशपांडे मुलमुले (पुणे) यांनी शब्दबद्ध केलेल्या ब्रेल-पुस्तकावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात विनिता हिंगे व भावना खरे विचार मांडतील. द्वितीय सत्रात दुपारी ३ वाजता आयोजित कथाकथनाच्या अध्यक्षस्थानी घनश्याम आसुदानी (नागपूर) राहणार असून प्रभाकर कदम (सोलापूर), रेवानंद मेश्राम (चंद्रपूर), प्रा. मीनल रोहणकर, साधना उमाळकर, प्रा. डॉ. सुचिता ठाकरे, सुषमा पाखरे, प्रा. अभिजित डाखोरे (हिंगणघाट) हे लेखक कथा सादर करतील.
सायंकाळी ६ वाजता काशिनाथ महाजन (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलन आयोजित असून गझलकार विद्यानंद हाडके (आर्वी) सूत्रसंचालन करतील. या काव्यसंध्येत प्रकाश पंडागळे (मुंबई), ज्ञानेश्वर वन्हाडे (वाशीम), नरेंद्र ताकसांडे, छत्रपाल तामगाडगे, सुरेश बंजारी, सूर्यकांत मुनघाटे, चरणदास वैरागडे, नरेश पाटील, शरद कांबळे (नागपूर), गंगाधर मुटे (आर्वी छोटी), डॉ. अनिल दुबे, इम्रान राही, प्रीती तडस वाडीभस्मे, तेजस भातकुलकर, मंजुषा ठाकरे चीगावकर, कविता वेदरकर, वृषाली मरतोडे, राहुल राऊत, स्वाती संगणे (वर्धा) ॲड. इब्राहिम बक्ष आझाद, नरेंद्र गंधारे (हिंगणघाट), सुरेश सुरजुसे (करंजी काजी) या कवींचा सहभाग राहणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार, दि. २५ रोजी सकाळी १० वाजता सिनेनाट्य दिग्दर्शक तथा नाम फाउंडेशनचे समन्वयक हरिश धापे ‘मन, मेंदूला अनलॉक करू या’ या विषयावर प्रेरक संवाद साधतील. सकाळी ११ वाजता सुरसंगम गीतगुंजन या कार्यक्रमात जियाउद्दीन शेख (चंद्रपूर), पूजा शेंदरे (यवतमाळ) आणि उपस्थित गायक गायिका सुगम गीते सादर करणार आहेत.
संमेलनाचा समारोप दुपारी १२ वाजता होणार असून यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, संमेलनाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. विनोद अदलखिया, ॲड. दिनेश शर्मा, स्वागताध्यक्ष भोजराज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ गेल्या ५० वर्षांपासून अंध व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन तसेच त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक जीवनाच्या उन्नतीकरिता कार्यरत असून याच अनुषंगाने अंध व्यक्तींचा साहित्याशी संपर्क वाढावा आणि मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी पहिले जागृत दृष्टी साहित्य संमेलन वर्ध्यात आयोजित करण्यात आले असल्याचे भोजराज पाटील यांनी सांगितले. साहित्यप्रेमी नागरिकांनी या संमेलनाला उपस्थित राहून उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्रचे महासचिव डॉ. पी. जाधव, कोषाध्यक्ष डी. एन. मरडे, संमेलन समन्वयक नरेंद्र नरोटे यांनी केले आहे.