वर्धा पोलिसांची बायपास मार्गावर स्टंटबाजी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवविरुद्ध विशेष मोहीम

६३ वाहनचालकांवर कारवाई; ६३ चलन केसेस दाखल; ५० हजार ५०० रुपयांचा दंड

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा शहरालगतच्या बायपास मार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध वर्धा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, रस्ते अपघातांना आळा घालणे आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करणे या उद्देशाने दत्तपूर ओव्हरब्रिज, जुनापाणी ओव्हरब्रिज, हिंदी विद्यापीठ ओव्हरब्रिज, सावंगी मेघे लोखंडी ओव्हरब्रिज, शांतीनगर आणि नागठाणा ओव्हरब्रिज या ठिकाणी ‘जीवन सुरक्षा अभियान’ अंतर्गत विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक, वर्धा वाहतूक नियंत्रण शाक्षेचे प्रभारी अधिकारी विजयकुमार धुळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड तसेच वाहतूक अंमलदार सहभागी झाले होते. रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभी केलेली अवजड वाहने, ट्रिपल सीट प्रवास करणारे दुचाकीस्वार, हेल्मेट न वापरणारे दुचाकीचालक, स्टंटबाजी करणारे वाहनचालक, सीटबेल्ट न लावणारे चारचाकीचालक आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवविरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एकूण ६३ चलन केसेस दाखल करून ५० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर करण्यात येणारी कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करणे आणि सर्व नागरिकांचा प्रवास सुरक्षित करणे हा आहे.

अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, वर्धा शहरालगतच्या बायपास मार्गावरील दत्तपूर, जुनापाणी, हिंदी विद्यापीठ, सावंगी मेघे, शांतीनगर आणि नागठाणा परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वायुपधेही नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *