शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचवा; रुग्णांचा विश्वास संपादन करा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य संवाद अंतर्गत विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

शासकीय रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश

रुग्णांचे अनावश्यक रेफरल टाळा, अनावश्यक रेफरलचे ऑडिट

वर्धा (जिमाका) : रुग्णालयांच्या इमारती उभारणे हेच आरोग्य विभागाचे उद्दिष्ट नसून प्रत्येक रुग्णाला वेळेत, दर्जेदार आणि विश्वासार्ह उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध असतानाही नागरिक खासगी रुग्णालयांकडे का वळतात, याची कारणे शोधून कामकाजात सुधारणा करावी. अनावश्यक रेफरल करणे टाळावे. शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचवा तसेच रुग्णांचा विश्वास संपादन करा, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती तसेच आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित आरोग्य संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांच्यासह ग्राम व जिल्हास्तरापर्यंतच्या विविध आरोग्य समित्यांचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट तयार करून त्यांच्या कामाचे नियमित मूल्यमापन करावे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करावी. नियुक्ती देऊनही रुजू न होणाऱ्या डॉक्टरांबाबत कठोर भूमिका घ्यावी. तसेच रुग्णांना अनावश्यकपणे दुसऱ्या रुग्णालयात रेफर करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी. रेफरल यंत्रणेचे नियमित ऑडिट करण्याची सूचनाही त्यांनी केली.

‘तिशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला’ हे महत्त्वाकांक्षी अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर दिला. आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण कमी करता येईल. आरोग्य विभागातील विविध समित्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कार्यरत झाल्या पाहिजेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गावपातळी, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय स्तरावरील समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील कामकाज गतिमान करण्यासाठी दरवर्षी मंत्री, राज्यमंत्री, सचिव आणि आयुक्त स्तरावर किमान दोन बैठका घेऊन त्रुटी व सूचनांचा आढावा घ्यावा. गावपातळीवरून प्राप्त होणाऱ्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. कोविड काळात आरोग्य विभागाने ज्या समर्पित भावनेने काम केले, त्याच पद्धतीने नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण कामकाज पुन्हा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

वर्धा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे त्यांनी कौतुक केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा ‘वर्धा पॅटर्न’ राज्यात राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णसेवा, प्रसूतीचे प्रमाण आणि संदर्भ सेवा यांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रुग्णालयांमध्ये मोफत औषधे व उपचार सुविधा उपलब्ध असतानाही रुग्ण शासकीय रुग्णालयांकडे का वळत नाहीत, याची कारणे शोधावीत. महात्मा फुले जनआरोग्य योजना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपचार सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवावे. हिंगणघाट येथील आरोग्यसेवेच्या कामकाजाचा दाखला देत ज्या ठिकाणी सेवा चांगल्या प्रकारे दिल्या जातात, तेथे नागरिकांचे समाधान दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे, औषधसाठा, रेफरल पद्धती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी संबंधित संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करावी. पुढील तीन महिन्यांत निश्चित केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) आणि कृती आराखड्यानुसार झालेल्या प्रगतीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वडनेर रुग्णालय जागेचा प्रश्न सोडवा : आ. कुणावार

यावेळी आमदार समीर कुणावार यांनी मॉड्युलर शवागार, डॉक्टरांची रिक्त पदे, औषधसाठा, रेफरल ऑडिट, महिला स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती तसेच वडनेर येथील रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागेचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.

रुग्णालयांतील रिक्तपदे भरणे आवश्यक : आ. बकाने

आमदार राजेश बकाने यांनी देवळी तालुक्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याचे निदर्शनास आणून ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली. पुलगाव व अल्लीपूर येथील रुग्णालयांचे प्रश्न सोडविण्यासह तालुक्यात असलेल्या नवीन आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्याची बाब त्यांनी मांडली.

आरोग्य व्यवस्था सुधारणेचा मास्टर प्लॅन : आ. वानखेडे

आमदार सुमित वानखेडे यांनी सुरक्षा रक्षक, परिचर आणि आरोग्य सेवकांची कमतरता दूर करावी, रुग्णालयांमध्ये नियमित स्वच्छता ठेवावी, जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाचा सर्वंकष मास्टर प्लॅन तयार करावा तसेच रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्याची मागणी केली.

बैठकीदरम्यान अल्लीपूर, वायगाव, गिरड, समुद्रपूर, नांदोरी, नारा आणि अंतोरा येथील आरोग्य संस्थांच्या प्रतिनिधींशी आरोग्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. संबंधित संस्थांमधील औषधसाठा, प्रसूतींची संख्या, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या आणि उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल यावेळी आरोग्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *