कर्जमाफी, नुकसानभरपाईसह विशेष पॅकेजची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; शेतकऱ्यांसाठी सहा प्रमुख मागण्या मांडल्या
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : महाराष्ट्रातील शेतकरी कमी पाऊस, पीक उत्पादनातील घट आणि वाढत्या शेतीखर्चामुळे आर्थिक संकटात सापडला असताना, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी खासदार अमर शरदराव काळे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जमाफी, पीक नुकसानभरपाई आणि विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शासनाने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
खासदार अमर काळे यांनी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठवलेल्या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही भागांत कृषी उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यातच बियाणे, खते, कीटकनाशके आणि अन्य कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण अधिक वाढला आहे. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च आणि कर्जाची परतफेड करताना शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज खासदार काळे यांनी व्यक्त केली आहे.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीला गती देण्याची मागणी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेला नसल्याचा मुद्दा काळे यांनी उपस्थित केला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी सहा प्रमुख मागण्या
खासदार अमर काळे यांनी आपल्या पत्रातून सहा महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. १. कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी: सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर मिळावा. २. पीक नुकसानभरपाई: कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी. ३. दुष्काळग्रस्तांना दिलासा: दुष्काळग्रस्त भागातील तसेच मदतीपासून वंचित राहिलेल्या बाधित शेतकऱ्यांचाही मदत योजनेत समावेश करावा. ४. कर्जवसुलीला स्थगिती: आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियमानुसार कर्जवसुली स्थगित करण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत.