-
खासदार अमर काळे यांचे जिल्हाधिकारी वर्धा आणि अमरावती प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांसाठी पत्र
-
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा डेपो सुरू करा
-
पशुधनासाठी पाणी व चायाची व्यवस्था करण्याची मागणी
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार अमर शरदराव काळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, वर्धा यांना पत्र देऊन जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्यासह पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.
खासदार काळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकरी व पशुपालकांसमोर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी वाट पाहाता प्रशासनाने प्रतिबंधत्मक उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
चारा डेपो सुरू करण्याचे नियोजन करा!
वर्धा जिल्ह्यात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने जनावरांसाठी चायाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कमी पावसामुळे पिकांची स्थिती प्रभावित झाल्यास जनावरांच्या चायाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो सुरू करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदारानी केली आहे. जनावरांना चारा उपलब्ध न झाल्यास पशुपालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठोस व्यवस्था करा ग्रामीण भागातील जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची गरज खासदार काळे यांनी अधोरेखित केली आहे. तसेच जंगलातील वन्यप्राण्यांनाही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जंगल परिसरात तात्पुरत्या पाणवठ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.जंगलतील पाण्याचे स्रोत आटल्यास वन्यप्राण्यांना यासाठी भटकंती करावी लागू शकते. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून वनविभागानेही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दुग्धव्यवसायाला आर्थिक फटका बसू नये
वर्धा जिल्ह्यात दुग्धव्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा महत्वाचा आधार आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढल्यास पशुपालकांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पशुधनाचे संरक्षण आणि दुग्धव्यवसाय टिकवण्यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे, अशी मागणी काсаदारांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे जनावरांसाठी चारा विकत घेणे शक्य होणार नाही, अशा गरजू पशुपालकांना शासकीय उपाययोजनांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या उपाययोजनाबाबत अहवाल मागवला
जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, चारा डेपो सुरू करण्याचे नियोजन, तसेच वन्यप्राण्यांसाठी पाणवठे उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.